संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात तहसील कार्यालयातील कारवाई टाळण्यासाठी आश्वी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उप निरीक्षक रवींद्र भानुदास भाग्यवान (वय – ५२) यांना लाच स्विकारताना नगरच्या लाचलुचपत विभागाने तांब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आश्वी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. यात तहसील कार्यालयात नेण्याची कारवाई होणार होती. मात्र ही कारवाई टाळण्यासाठी सहायक पोलीस उप निरीक्षक रवींद्र भाग्यवान यांनी लाच मागितली होती. याबाबतची तक्रार लाच प्रतिबंध विभाग अहमदनगर यांच्याकडे करण्यात आली होती.
शनिवार दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी सापळा लावण्यात आला होता. यावेळी भाग्यवान यांनी १० हजार लाचेची मागणी केली आणि तडजोडी अंती ९ हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले असून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान ही कारवाई लाच प्रतिबंध विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, चापोहेकॉ दशरथ लाड यांनी केली आहे. तर नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत विभागाचे वाचक पोलीस निरीक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.