ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुर्हे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मुऱ्हे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांची मावळ तालुक्यात मोठी ताकद आहे.
मुर्हे यांनी अचानक राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, संतोष मुर्हे यांच्यासह मावळ तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्त केला आहे.त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मावळमध्ये अजित पवार गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना पक्षीय पातळीवर दुय्यम स्थान दिले जात असल्याने नाराजीतून हा राजीनामा देण्यात आला असल्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे, अजित पवारांनी दिलेल्या आदेशानंतर मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यात नाराज असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची नाराजी दूर करण्यात यश आले आहे. पदाधिकाऱ्यांचा पदाचा राजीनामा हा वरिष्ठ पातळीवर नामंजूर करण्यात आला आहे.
परंतु गैरसमजातून काही घटना घडल्याने मावळ मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला होता. परंतु येणाऱ्या काळात कोणत्याचा दुजाभाव कोणत्याही कार्यकर्ता अथवा पदाधिकारी यांच्याबाबत मावळ तालुक्यात होणार नाही, असं खांडगे यांनी म्हटलं आहे.त्याचबरोबर सर्व नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची नाराजी दूर झाली असून ते सर्व जण आता मावळ तालुक्यात अजित पवार गटाचेच काम करणार असल्याचे स्पष्टीकरण मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिले आहे.