Saturday, September 14, 2024

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्याची डाळिंबे निघाली ऑस्ट्रेलियाला

अहमदनगरमधील शेतकऱ्याची डाळिंबे निघाली ऑस्ट्रेलियाला

कृषि पणन मंडळाच्या वाशी विकीरण सुविधा केंद्रातून पहिली खेप रवाना

अहमदनगर, दि.४: महाराष्ट्रातील डाळिंबांची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांना चाखायला मिळणार आहे. राज्यातून डाळिंबांची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्या खेपेतून जाणारी डाळिंबे ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील आहेत.

डाळिंब उत्पादनात भारत हा जगातील प्रमुख देश आहे, तर महाराष्ट्र हे प्रमुख देशातील प्रमुख डाळिंब उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्रात डाळिंबाची लागवड प्रामुख्याने सोलापूर, नाशिक, अहमदनगर, सांगली, पुणे, सातारा, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच बुलढाणा, जालना, बीड, छत्रपती संभाजी नगर, जळगाव व धुळे जिल्ह्यांमध्येही डाळिंबाचे क्षेत्र वाढत आहे. या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या परिश्रमांमुळे आणि विकिरण सुविधा केंद्राच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातील डाळिंबाचे फळ आता ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत प्रवेश करत आहे.

भारताचा डाळिंब उत्पादनाचा पहिला क्रमांक लागत असून सन २०२३-२४ मध्ये ७२ हजार मे. टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, बहारीन, सौदी अरेबिया, श्रीलंका इ. देशांना ही निर्यात केली जाते. तसेच युरोपियन देशांमधे इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड या देशांमधेही डाळिंबाची निर्यात होते. जागतिक बाजारपेठेत भारताव्यतिरिक्त स्पेन व इराण या देशांमध्येच निर्यातक्षम डाळिंब उत्पादित केले जाते. डाळिंब या फळामध्ये विशेष औषधी गुणधर्म असल्याने त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढत आहे.

वरील देशांव्यतिरिक्त अमेरिकादेखील डाळिंबासाठी मोठी बाजारपेठ आहे. सन २०१७ मध्ये अमेरिकन बाजारपेठ भारतीय डाळिंबासाठी खुली झाली. अमेरिका आणि इतर बाजारपेठांनंतर आता ऑस्ट्रेलिया ही आणखी एक महत्त्वाची बाजारपेठ खुली करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. ऑस्ट्रेलियाने २०२० मध्ये भारतातून डाळिंबाच्या निर्यातीसाठी मंजुरी दिली होती. भारताने १४ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित भारत ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय योजना तांत्रिक बैठकीत ऑस्ट्रेलियाला निर्यात करणाऱ्या डाळिंब फळांसाठी आंतरराष्ट्रीय कार्य योजना (OWP) आणि मानक (SOP) कार्यपद्धतीवर स्वाक्षरी केली. त्यामध्ये माईट वॉश, सोडीयम हायपोक्लोराईड प्रक्रिया, वॉशिंग-ड्राईंग इ. प्रक्रिया करुन ऑस्ट्रेलियाने निश्चित केलेल्या मानांकानुसारच्या बॉक्समध्ये पॅकिंग करुन डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करणे इत्यादी बाबींचा अंतर्भाव आहे.

वाशी येथील कृषि पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रात डाळिंबाच्या विकिरण प्रक्रियेच्या चाचण्या कार्यकारी संचालक संजय कदम यांच्या मार्गदर्शनाने व कृषि पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. या चाचण्यांची माहिती एन.पी.पी.ओ. यंत्रणेमार्फत ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांना सादर करण्यात आली. कृषि पणन मंडळाच्या विकीरण सुविधा केंद्रावरील यशस्वी चाचण्यांमुळे सदर सुविधा केंद्र ऑस्ट्रेलियन यंत्रणेमार्फत व भारतीय एन.पी.पी.ओ. मार्फत प्रमाणित करण्यात आले. ऑस्ट्रेलिया येथे डाळिंब निर्यातीकरिता कृषि पणन मंडळाची वाशी येथील विकीरण सुविधा ही देशातील एकमेव प्रमाणीत सुविधा आहे. या सुविधेवरुन अपेडा, भारत सरकार, एन.पी.पी.ओ., महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ व के. बी. एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऑस्ट्रेलियास डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले.

या सुविधा केंद्रावरूनच पहिली खेप पाठविण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील प्रगतीशील महिला शेतकरी कल्पा खक्कर यांच्या बागेमधील डाळिंबाची निवड करण्यात आली. अपेडाच्या सहकार्याने मे. के. बी. एक्सपोर्ट यांनी ऑस्ट्रेलियामध्ये ही पहिली खेप (कन्साईनमेंट) पाठविण्यासाठी पुढाकार घेतला. डाळिंब कंटेनरसाठी के.बी. एक्सपोर्ट यांच्या पॅकहाऊसमध्ये डाळिंबाची प्रतवारी करुन त्यावर निश्चित केलेल्या प्रणालीनुसार प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर हे डाळिंब ४ किलोच्या बॉक्समध्ये भरुन त्यावर विकिरण सुविधा केंद्र आणि एन.पी.पी.ओ. यांच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती व मान्यतेनंतर डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. कृषी पणन मंडळ, अपेडा व एन.पी.पी.ओ. यांच्या संयुक्त प्रयत्नाने डाळिंबाच्या ३२४ बॉक्सेसमधील १ हजार २९६ किलो डाळिंबांवर विकिरण प्रक्रिया करून हा माल विमानमार्गे ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न येथे रवाना करण्यात आला.

ही डाळिंबे ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या फाईन फुड ऑस्ट्रेलिया या प्रदर्शनामध्ये अपेडामार्फत प्रदर्शित केली जाणार आहेत. त्याद्वारे तेथील स्थानिक ग्राहकांना आकर्षित करून भारतीय डाळिंबासाठी ऑस्ट्रेलियन बाजारपेठ काबीज करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. भारतीय डाळिंबांनी ही बाजारपेठ काबीज केल्यानंतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे के.बी. एक्सपोर्टचे संचालक कौशल खट्टर यांनी सांगितले.

राज्यातील डाळिंब हे ऑस्ट्रेलियासाठी पाठविणे हा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अभिमानास्पद क्षण आहे. यामुळे इतर निर्यातदारदेखील कृषि पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावरून ऑस्ट्रेलिया येथे डाळिंब निर्यातीसाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री. कदम व श्री. कोकरे यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles