नगर : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी थेट पाथर्डीमध्ये येऊन मारत बहुचर्चित आय ए एस पूजा खेडकरच्या कुटुंबासंदर्भातील कागदपत्रे तहसील कार्यालयातून ताब्यात घेतली. पूजा खेडकर यांचा भारतीय प्रशासनातील प्रवेश गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त बनला आहे.
मात्र केलेल्या कारवाईसंदर्भात दिल्ली पोलिसांनी काहीही बोलण्यास नकार दिला. पूजा खेडकर यांच्या विरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच तपासाच्या अनुषंगाने दोन अधिकारी पाथर्डीमध्ये आले व त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन पूजा खेडकर यांच्या आई तथा भालगावच्या (ता. पाथर्डी) माजी सरपंच मनोरमा खेडकर यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवताना जो उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयाकडे सादर केला, त्या अर्जाची प्रत व त्यासोबत दाखल केलेली सहायक कागदपत्रे ताब्यात घेतली.
खेडकर यांचे मूळगाव भालगाव आहे. मनोरमा खेडकर या भालगावच्या माजी सरपंच आहेत. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही त्यांनी उमेदवारी केली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भालगावच्या सरपंच पदाची निवडणूक लढवली. त्यावेळी त्या लोकनियुक्त सरपंच झाल्या. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
या निवडणुकांसाठी मनोरमा खेडकर यांनी जे उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यासोबतच्या कागदपत्रांच्या प्रती दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्या.