अहमदनगर-प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्ती तयार न करता पर्यावरण पूरक मूर्ती तयार कराव्यात. तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपी साहित्याची विल्हेवाट लावावी. पीओपी साहित्य अथवा साठा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे. दरम्यान या निर्णयामुळे गणपती मूर्ती बनवणारे कारखानदार अडचणीत आले आहेत. शासनाच्या आदेशामुळे हजारो कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.नगर महापालिकेने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करणाऱ्या 130 कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार काेणत्या प्रकारच्या गणेशमूर्ती हव्यात याबाबत नोटीस काढली आहे. यामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाईचा इशारा मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे.
या निर्णयावर आज अहमदनगर मनपात गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांनी मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. गुजरात न्यायालयाचा निकाल, औरंगाबाद खंडपीठाचा निकाल आणि मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्यावर्षी विधानसभेत पीओपी गणेश मूर्तीला कोणतीही बंदी नाही या केलेल्या निवेदनाचा संदर्भ देत गणेश मूर्तीकारांनी आपले म्हणणे मांडले.
परंतु प्रशासन त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. आजच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. केंद्रीय प्रदूषण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सूचनेनुसार आम्ही संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत. प्रदूषण मंडळाकडून ज्या सूचना देण्यात आल्यात त्याचे सर्व कारखानदारांनी पालन करावे असं आयुक्त पंकज जावळे यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय प्रदूषण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सूचनेनुसार आम्ही संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत, प्रदूषण मंडळाकडून या सूचना देण्यात आल्यात त्याचे सर्व कारखानदारांनी पालन करावे असं आयुक्त पंकज जावळे यांनी म्हटले आहे. तर मनपाच्या या निर्णयाविरोधात लवकरच जनआंदोलन उभा केलं जाईल, अशी भूमिका गणेश मूर्तीकारांनी घेतली आहे.