केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’ या नावाने ओळखलं जाणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. या संकल्पापासून प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचं नाव ‘श्री विजयपुरम’ असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यामधील अंदमान निकोबरचं योगदान दर्शवत राहील”.
इंग्रजांनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांना, वास्तूंना दिलेली नावं मोदी सरकार बदलत आहे. केंद्राने आतापर्यंत अनेक शहरांची नावं बदलली आहेत. त्यात आता पोर्ट ब्लेअरचं नाव समाविष्ट झालं आहे. पोर्ट ब्लेअर हे बंदर आता श्री विजयपुरम या नावाने ओळखलं जाईल. १७८९ साली ईस्ट इंडिया कंपनीने आर्चीबाल्ड ब्लेअर यांच्या सन्मानार्थ या बेटाचं नाव पोर्ट ब्लेअर असं ठेवलं होतं, जे आता मोदी सरकारने बदललं आहे.