३० जूनला राष्ट्रवादीची महत्वाची बैठक झाली. अजित पवारांनी माझी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली. अजित पवारांची नेता म्हणून निवड झाली. अनिल पाटील यांना प्रतोद म्हणून नेमण्यात आले. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, म्हणून आपोआप चिन्ह आणि अन्य विषय असतात ते आम्हाला मिळायला हवेत यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
ही फूट नाही, वेगळी काही कारवाई असे काही समजत असाल असे नाही. हे पक्षाचे बहुमत अजित पवारांच्या मागे उभी आहे, हे आयोगाकडे याचिकेद्वारे ३० तारखेला दाखल केले आहे. काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली, मी त्याला दुसरे नाव देणार नाही. ती राष्ट्रवादीची अधिकृत बैठक नव्हती. कोणताही पक्ष रजिस्टर झाल्यानंतर त्याचे संविधान आणि नियम आम्हाला तयार करावे लागतात. त्यावरच आम्हाला खालून वरपर्यंतची प्रक्रिया राबवावी लागते, असे ते म्हणाले.
या संविधानात पक्षाची निवडणूक ही ब्लॉकपासून ते अध्यक्षांपर्यंत ही करायची असते. यात नेमणुकीचे अधिकार नसतात. खालचा पाया जर कोसळला तर वरचे स्ट्रक्चर फॉल्टी आहे आणि ते कोसळते. सप्टेंबर २०२२ मध्ये राष्ट्रीय कन्व्हेंशन झाले. ते केव्हा होते. मी गोंदिया जिल्ह्याच्या डेलिगेशनमध्ये आहे, तर मुंबईत येईल आणि तिथली निवडणूक घेईल. २०२२ मध्ये अधिवेशन झाले तरी नक्की कोण डेलिगेट होते, अजून निवडणुकीची प्रक्रियाच सुरु झालेली नाही. दोन तीन जिल्ह्यांत ही प्रक्रिया सुरु होती. माझ्या स्वाक्षरीने मी राज्याचे प्रमुख निवडले आहेत. त्यामुळे ते निवडणूक न होता निवडले गेले होते. महाराष्ट्रातच पक्षाची निवडणूक झाली नव्हती. मग देशात कशी होणार, असा सवाल पटेल यांनी केला.
राष्ट्रवादीचा ढाचा हा पूर्णपणे फ्रॉड होता. नॉमिनेटेड आहेत, त्यांना कोणी केले? माझ्या सहीने हे झाले आहे. प्रत्येकाला कोणी ना कोणी नियुक्त केले होते. निवडणूक आयोगासमोर असे अनेक प्रसंग आलेले आहेत. २००३ मध्ये पीए संगमा आणि पवार यांचा विषय झालेला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाने एवढा मोठा निकाल दिला होता. पक्षामध्ये काही मतभेद असतील तर ते थांबविता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. अशा परिस्थितीत आमदारांवर अपात्रतेची कारवाई करू शकत नाही, हे शिवसेनेत घडले आहे, असे पटेल म्हणाले. निवडणूक आयोग पक्ष कोणाचा हे सांगतो. तर विधिमंडळ पक्ष कोणाचा हे विधानसभा अध्यक्ष सांगतो. या सर्वांवर महत्वाचा निर्णय़ घेण्याची ताकद निवडणूक आयोगाकडे आहे. यामुळे अजित पवारांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यावर आता निवडणूक आयोग कार्यवाही करणार आहे, असे पटेल म्हणाले. जयंत पाटलांनी अपात्रतेची याचिका दाखल केली आहे, परंतू जयंत पाटील आमचे अध्यक्ष आहेत का? आमच्या संविधानानुसार ते नाहीत, मग अपात्रतेची कारवाई करणारे ते कोण? पाटील कोणत्याही नियमात बसत नाहीत. एकाही आमदाराला अपात्र करू शकत नाहीत, असे पटेल म्हणाले.