पक्षात फूट पडल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा गट म्हणजेच शरद पवार गट अजित पवार आणि त्यांच्या बंडखोर सहकाऱ्यांवर टीका करत आहे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीलाही लक्ष्य करत आहे.
अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल्ल पटेल गुरुवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, आज मी तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतो. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आमच्या आणि शिवसेनेच्या विधानसभेच्या जागा जवळपास सारख्याच होत्या. मला आठवतंय, मी शरद पवारांना बोललो, मी त्यांना विनंती केली, आपण त्यांच्याबरोबर सरकार बनवतोय, त्या दिशेने आपण पुढे गेलो आहोत. परंतु, त्यांच्याकडे ५६ आमदार आहेत आणि आपल्याकडे ५४ आमदार आहेत. तर सत्तेतील अर्धा काळ (अडीच वर्ष) आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. आपल्या आणि शिवसेनेच्या आकड्यांमध्ये फार मोठा फरक नाही.
यावर पटेल यांना विचारण्यात आलं की, तुम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं होतं का? त्यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, हो, आम्हाला सत्तेच्या अर्ध्या कार्यकाळा मुख्यमंत्रीपद हवं होतं. मी तसं शरद पवारांना बोललो. त्यावर शरद पवारांनीच मला सांगितलं की तुम्ही जा आणि त्यांच्याशी (उद्धव ठाकरे) बोलून घ्या. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यांच्याशी बोललो. आदित्य ठाकरेदेखील तिथेच बसले होते. मी उद्धव ठाकरेंना म्हणालो, आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्या. त्यावर उद्धव आणि आदित्य ठाकरे काहीच बोलले नाहीत.