अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहे. सिनेविश्व, ओटीटी, टेलिव्हिजन अशा सर्व प्लॅटफॉर्मवर ती सक्रिय आहेच, याशिवाय अभिनेत्रीने तिचे विविध बिझनेसही थाटले आहेत. ‘प्राजक्तराज’ हा दागिन्यांचा ब्रँड, पुण्यात डान्स क्लासेस, कर्जतमध्ये फार्महाऊस आणि अभिनय क्षेत्रातील कारकीर्द, असं सगळं अतिशय उत्तम पद्धतीने तिच्या आयुष्यात सुरू आहे. तरीही तिला लग्न कधी करणार? हा सवाल चाहत्यांकडून विचारला जातोच. काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने असाच एक लग्नाविषयीचा सवाल तिच्यासाठी गुरुस्थानी असणाऱ्या ‘श्री श्री रविशंकर’ यांना विचारला होता.
प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने श्री श्री रविशंकर विचारलेले की, ‘लग्न करणे अनिवार्य आहे का?’ त्यांनी तिला प्रतिप्रश्न केला की, ‘तुम्ही हे मला विचारताय का?’ त्यांच्या या प्रतिसादानंतर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला होता. ते पुढे म्हणाले की, ‘असे असते तर केव्हाच माझ्या बाजूला आणखी एक खुर्ची लागली असती किंवा डबल सोफा बसवावा लागला असता’.
पुढे आणखी सखोल उत्तर देत ते म्हणाले की, ‘अशी काही आवश्यकता नाही, फक्त आपण आनंदी राहिले पाहिजे. लग्न करुन किंवा एकट्याने जगून आनंदी राहा. काही लोकांचं काय होतं, लग्न करुनही किंवा एकट्याने राहूनदेखील ते दु:खी राहतात. तर काही लोक असे असतात की जे एकटे राहिले काय किंवा त्यांनी लग्न केले काय ते आनंदी असतात. मला असे वाटते आनंदी राहण्याचा पर्याय सर्वांनी निवडायला हवा.’