मंगळवारी (३० जानेवारी) मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितला मविआत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा तसेच महाविकास आघाडीने अधिकृत पत्रक जारी करून वंचितला मविआत सहभागी करून घेतल्याचं जाहीर केलं होतं. या पत्रकावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. परंतु, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही, असं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या मविआतील समावेशाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अद्याप वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. कारण वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायचं असेल तर काँग्रेसच्या वरच्या नेतृत्वाने (दिल्लीतलं हायकमांड) मान्यता दिली पाहिजे. हायकमांडने तशी मान्यता दिली आहे की नाही, हे अद्याप आम्हाला माहिती नाही