राज्य सरकारने नुकताच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली असून त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. या योजनेनुसार जुलै महिन्यापासून राज्यातील महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेच्या अंमलबजावणीवर विरोधकांकडून टीकादेखील करण्यात येत आहे. अशातच आता मुस्लीम समाजातील ज्या व्यक्तीला दोन पत्नी आहेत अशा कुटुंबाला आणि दोनपेक्षा जास्त अपत्य आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये, अशी मागणी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.
प्रकाश महाजन यांनी आज टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं. “मुस्लीम समाजात ज्या पुरुषाला दोन पत्नी आहेत किंवा ज्या महिलांना दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत, असा महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये”, असे ते म्हणाले. “या देशात लवकरच लोकसंख्येचा स्फोट होणार असून वाढत्या लोकसंख्येचा भार, जे लोक दोनपेक्षा जास्त अपत्य होऊ देत नाहीत, त्यांच्यावर पडतो, त्यांच्या कराचा पैसा दुसरीकडे खर्च होतो, अशा महिलांना या योजनेचा लाभ दिल्यास, खरे गरजू मागे राहतील”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली