नगर : जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद राऊत यांची गुणवंत कर्मचारी म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वचस्तरातून अभिनंदन होत आहे.
ग्राम विकास विभागांतर्गत राज्य शासनाच्या तसेच केंद्र पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात. अशा काही योजना / प्रकल्प राबवितांना संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य पणाला लागते. असे प्रकल्प पूर्ण करताना अधिकारी / कर्मचाऱ्यांमध्ये विशेष वैयक्तिक कौशल्य व गुणवत्ता आढळून येते.
अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची योजना शासनाने ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय २ सप्टेंबर, २००५ अन्वये सन २००५-२००६ पासून सुरु केली आहे. त्यानुषंगाने सन २०२१-२०२२ यावर्षी ग्राम विकास विभागातील मंत्रालयातील (खुद्द) व क्षेत्रिय स्तरावरील गुणवंत अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सन २०२१-२२ या वर्षाकरीता राज्यातील ३७ गुणवंत अधिकारी / कर्मचारी यांची पुरस्कारासाठी अंतिम निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद राऊत यांची गुणवंत कर्मचारी म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वचस्तरातून अभिनंदन होत आहे.