मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषाने पछाडलेले आहे. महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी जरांगे पाटील यांनी सुपारी घेतली आहे, असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील आणि उदयनराजे यांच्याबाबत केलेल्या दाव्यानंतर जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना दरेकर यांनी हा आरोप केला आहे.मी जर फुंकलो असतो तरी, उदयनराजे पडले असते, असं मनोज जरांगे पाटील यांनी मला सांगितल्याचा दावा राजेंद्र राऊत यांनी केल्यानंतर त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचं जरांगे यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रवीण दरेकर यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.
मनोज जरांगे यांना फडणवीस यांच्या द्वेषानं पछाडलेलं आहे. आता राजेंद्र राऊत यांच्या मागे पण फडणवीस आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे त्यांचे डोळे तपासण्याची खरंच वेळ आली आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. याच राजेंद्र राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंशी संवाद साधून मार्ग काढावा, तसेच जरांगे यांचे मोठेपण सांगताना मी सातत्याने त्यांना पाहिलं आहे, असंही दरेकर म्हणाले.
मी म्हणजे सर्वश्रेष्ठ. मी म्हणजे मराठ्यांचा देव आहे, अशा प्रकारे जरांगे वागत आहेत. त्यांच्या भ्रमाचा भोपळा आता फुटत आहे. त्यांना जळी- स्थळी देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, असंही दरेकर म्हणाले. महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी मनोज जरांगे यांनी सुपारी घेतली आहे, असा आरोपही त्यांनी केला.