बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्यावतीने तोंडाला काळी पट्टी व काळे झेंडे घेऊन निषेध करत जनआंदोलन झाले. यावेळी राज्यात बालिका व महिला सुरक्षित नसून सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. तसेच कायदा-सुव्यवस्था ढासाळलेल्या महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेर बसस्थानकावर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट, आरपीआय व पुरोगामी संघटनांच्यावतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 24 ऑगस्ट) जनआंदोलन झाले. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, शिवसेनेचे अमर कातारी, संजय फड, अप्पा केसेकर, कैलास वाकचौरे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जनआंदोलनानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार थोरात म्हणाले, बदलापूरची झालेली घटना ही अत्यंत लांच्छनास्पद आहे. या घटनेतील गुन्हेगाराची पार्श्वभूमी ही वाईट होती. संस्थाचालकांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला त्याला पोलिसांची साथ मिळाली. मंत्रालयामधून दबाव होता की काय असे महाराष्ट्राला वाटत आहे. लाडकी बहीण योजना सर्वत्र सुरू आहे. मंत्रिमंडळ बहिणींकडून राख्या बांधून फोटोसेशन करत आहे.
मात्र या बहिणींचे रक्षण करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात बालिका व महिला असुरक्षित असून बेकायदेशीररित्या गठीत झालेले हे खोके सरकार सत्तेवर राहण्याच्या लायक नाही. मागील आठ दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या खूप घटना घडल्या आहेत. प्रशासनाचा धाक राहिला नाही. मंत्रालयात सर्व फक्त टक्केवारीत गुंतले आहेत. गुन्हेगारांवर धाक राहिला नाही. महिलांची अब्रू सुरक्षित नाही. बदलापूरमध्ये जनता एकत्र येऊन निदर्शने करत होती, सत्ताधारी मात्र त्याला राजकीय हेतू म्हणतात ही चूक आहे. न्यायालयाचा मान राखत आम्ही जनआंदोलन केले यालाही आता राजकीय हेतू म्हटला जात आहे. खरे तर हे सरकार दुर्दैवी राजकारण करत आहे. आपण चाळीस वर्षे राज्याच्या राजकारणात आहोत. मात्र इतके वाईट राजकारण कधीही पाहिले नाही.