अॅपल कंपनीनं त्यांच्या आयफोन्सच्या किमती कमी केल्या आहेत. खरंतर मोबाईल युजर्ससाठी ही आनंदाची बातमी असून कोणत्या आयफोन मॉडेले दर कमी झाले आहेत, यासंदर्भात कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृ्त दिलं आहे.
आयफोन प्रो व प्रो मॅक्स मॉडेल्ससाठी भराव्या लागणाऱ्या पैशांमध्ये घट झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्यात iPhone 13, iPhone 14 व iPhone 15 या मॉडेल्सचा समावेश आहे. या फोन्सच्या किमती साधारणपणे ३०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे iPhone SE श्रेणीतील फोनच्या किमती जवळपास २३०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. याशिवाय प्रो श्रेणीतील इतर मॉडेल्सच्या किमतीही वेगवेगळ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.
सर्वात जास्त दरकपात आयफोन १५ प्रो मॉडेलची झाली आहे. आयफोन प्रो १२८ जीबी मॉडेलची किंमत आधी १ लाख ३४ हजार ९०० रुपये इतकी होती. आता हा मोबाईल १ लाख २९ हजार ८०० रुपयांना उपलब्ध असल्याचं फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे या आयफोनची किंमत तब्बल ५ हजार १०० रुपयांनी कमी झाली आहे.