आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यातील महायुती कामाला लागली आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपच्या महायुतीकडून आज राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. बीडमध्ये महायुतीच्या मेळाव्यादरम्यान बॅनरवर भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडेचा फोटो नसल्याने मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणावरुन आता खासदार प्रीतम मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.आज बीड शहरात महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच बॅनरवरील फोटोवरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बॅनरवर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा फोटो नसल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांच्या या नाराजीनाट्यानंतर तात्काळ आयोजकांवर बॅनर बदलावे लागले. या प्रकरणावरुन आता प्रीतम मुंंडेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
“मुंडे साहेबांचा फोटो भाजपाच्या प्रोटोकॉल मध्ये का येत नाही का? बीड जिल्ह्यामध्ये भाजपने स्व.मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही, असा इशारा प्रीतम मुंडे यांनी दिला. तसेच मुंडे साहेबांच्या नावाशिवाय महाराष्ट्रातील कुठलेही मोठी घडामोडी घडत नाही, त्या मुंडे साहेबांचा फोटो प्रोटोकॉल मध्ये नाही हे कारण मनाला पटत नाही;” अशी खंत देखील प्रीतम मुंडे यांनी बोलून दाखवली.