दहशतीच्या सावटाखाली असलेल्या एमआयडीसीच्या कामगारांना सुरक्षा द्या
स्वराज्य कामगार संघटनेची मागणी; एमआयडीसी पोलीस स्टेशनला निवेदन
रात्री पोलीसांची गस्त वाढवून, मारहाण व लुटमारीच्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसीच्या कामगारांना रात्री-अपरात्री रस्त्यात अडवून मारहाण करुन त्यांना लूटण्याच्या घटना घडत असताना सर्व कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एमआयडीसीच्या कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी पोलीस गस्त वाढवून, या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी स्वराज्य कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकिरे, जनरल सेक्रेटरी योगेश गलांडे, सुनील कदम, स्वप्निल खराडे, प्रदीप दहातोंडे, अभिजीत सांबारे, अजिनाथ शिरसाठ, जितेंद्र तळेकर, अमोल ठोकळ, सचिन दाताळ, भरत दिंडे, सोपान कदम, सोमनाथ बारबोले, रामनाथ घुगे, वसीम शेख, सचिन खेसे, राहुल मेहेरखांब, किसन तरटे, बाबासाहेब गांगर्डे, आप्पासाहेब बोंबले, शरद काळे, अविनाश कर्डिले, सोमनाथ शिंदे, उमेश जंबोकर, महेश जाजगे, विष्णू घुगे आदींसह कामगार वर्ग उपस्थित होते.
एमआयडीसीत रात्री कामगार घरी जाताना त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करुन लुटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे. यामुळे कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एमआयडीसी कंपनीमध्ये तीन शिपमध्ये काम चालते. कामगारांचे पगार 5 ते 10 तारखे दरम्यान होतात, याच कालावधीत त्यांना लुटण्याचे घटना घडलेल्या आहेत. चोरांच्या टोळक्यांकडून पल्सर सारख्या विना नंबरच्या गाडीवरून मागून येऊन त्यांना अडवून रॉडने किंवा दांडक्याने मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल, पैसे काढून घेतले जात आहे. यामध्ये कामगारांना जबर मारहाण केली जात असून, या घटनेत एखाद्याचा जीव जाण्याची वेळ आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
एमआयडीसी रस्त्यालगत काही पान टपऱ्या असून, तेथे हातभट्टी, दारू विक्री केली जाते. याच ठिकाणी गुंड व गुन्हेगारी प्रवृत्ती पोसली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तातडीने पोलीस प्रशासनाने रात्री 9 ते 12 या वेळेत गस्त वाढवावी, रस्त्यालगत असलेल्या पान टपऱ्यांच्या नावाखाली सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई व्हावी, लुटमार करणाऱ्या चोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
एमआयडीसीत परप्रांतीय व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आलेले गोर-गरीब कामगार वर्ग मारहाण व लुटीच्या घटनेमुळे दहशतीच्या सावटाखाली आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना संरक्षण द्यावे. या प्रकरणात एखाद्या कामगाराचा जीव जाण्याची वाट न पाहता, गंभीरतेने दखल घ्यावी. -दत्ता तापकिरे (अध्यक्ष, स्वराज्य कामगार संघटना)
एमआयडीसीचे चोर व गुंडांच्या दहशतीने नुकसान होत आहे. लुटमारीच्या घटनेने सर्वसामान्य गरीब कामगार कामावर जाण्यास देखील घाबरत आहे. असंघटित असलेल्या कामगारांना एकप्रकारे लक्ष्य केले जात असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वराज्य कामगार संघटनेने पुढाकार घेतला आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सकारात्मक उपाययोजना न झाल्यास संघटनेच्या माध्यमातून सर्व कामगार रस्त्यावर उतरतील -योगेश गलांडे (जनरल सेक्रेटरी, स्वराज्य कामगार संघटना)