पुण्यातील ड्रंक अँण्ड्र ड्राईव्ह प्रकरणात सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यावर ढिम्म पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर आलंय. आरोपी मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल याच्यासह तिघांना संभाजीनगरच्या लॉजमधून अटक करण्यात आली. अग्रवालने एका हॉटेलमध्ये तीन रुम बुक केल्या होत्या. मात्र पोलिसांना गुंगारा देत भलत्याच हॉटेलमध्ये रहायला गेला होता.
पोलिसांनी आधी थातूर मातूर कलमं लावल्यामुळे आरोपी मुलाला केवळ 12 तासांत जामीन मिळाल्याचा आरोप झाला. त्यानंतर आता पोलिसांची धावाधाव सुरू झालीय. त्यामुऴे आरोपीला सज्ञान ठरवण्याठी मागणी कोर्टात करणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.
परवाना नसताना वडिलांनीच पोर्शे कार चालविण्यासाठी दिल्याचं मुलानं सांगितलं. एवढंच नव्हे तर मद्यप्राशन करत असल्याची माहितीही वडिलांना होती, असंही त्यानं जबाबात म्हटलंय. त्यामुळे मुलासह बिल्डर बापाच्याही अडचणीत वाढ झालीय. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे 40 लाखांचा कर न भरताच पोर्शे कार रस्त्यावर धावत होती.
तर दुसरीकडे आरोपी मुलगा ज्या बारमध्ये दारू प्यायला त्या कोरेगाव परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबच्या व्यवस्थापक आणि मालकांनाही पोलिसांनी अटक केलीये. तसंच या दोन्ही बारना सील ठोकण्यात आलंय. या प्रकरणानंतर सर्वत्र संताप व्यक्त होतोय. अपघातातील मृत अश्विनी कोष्टाच्या वडीलांनी आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली आहे.