पुणे : सहा कोटींना गंडा घालून फरार झालेला आलेगाव पागाचा सरपंच यास शिरूर पोलिसांनी गजाआड केले आहे. अप्पा सीताराम बेनके असे या सरपंचाचे नाव आहे. हा फरार सरपंच गावात येणार असल्याची माहिती शिरूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला गजाआड केले आहे. शिरूर तालुक्यातील आलेगाव पागाचा सरपंच आप्पा बेनके याच्या विरोधात 2018 ते 2021 यादरम्यान फसवणूक केल्याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल झाल्यापासून अप्पा बेनके फरार होता. खोटी कागदपत्रे आणि शिक्के वापरून आतापर्यंत सहा कोटी रुपयांना त्याने गंडा घालता आहे. ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी पोलिसांत त्याच्याविषयी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखले केले. मात्र तो फरार असल्याने अद्याप त्याच्यावर कारवाई झाली नव्हती.
याविषयीची सविस्तर माहिती अशी, की रामचंद्र बेनके, सितारान बेनके, बापूसाहेब बेनके यांच्या शेतजमिनीवर सहा कोटी रुपये कर्ज काढले आणि त्या कर्जसाठी दिलेल्या जमिनीचे 7/12 उताऱ्यावर गावात नेमणूक असलेल्या तलाठी गोरक्षनाथ इंगळे यांच्या नावाची शिक्के तयार केले. तसेच खोट्या सह्या करून सातबारा उतारा, अधिक कर्ज बोजा नोंद त्याची खोटी नोट तयार करून स्वतःच सादर करून प्रथम फसवणूक केली होती. त्याबाबत रितसर फिर्याद दाखल झाली होती. मात्र त्यानंतर तो गायब झाला होता.






