पुणे : चंदननगर परिसरातील एका कंपनीत काम करत असलेल्या कामगाराबाबत ग्राहकांच्या खूप तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्याला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर काढले. याचा राग संबंधित कामगाराला आला. त्याने बांबू घेऊन येत कंपनीच्या अधिकाऱ्यास बेदम मारहाण केली. त्यांचा आयफोन तोडून नुकसानही केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी सत्यम शिंगवी याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अमोल शेषराव ढोबळे (वय- ३१, रा. लोहगाव, पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
तक्रारदार अमोल ढोबळे यांच्या कंपनीत आरोपी सत्यम शिंगवी हा कामास होता. त्याच्या विरुद्ध अनेक ग्राहकांच्या भरपूर तक्रारी येत असल्या कारणाने तक्रारदार यांनी त्यास समजवून सांगण्यासाठी फोन कॉल केला होता. परंतु आरोपीने सदर कॉल उचलला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यास व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केले.
त्याचा राग येऊन आरोपी ऑफिसमध्ये आला व त्याने तक्रारदार यांना ‘तुम्ही मला ग्रुपमधून का काढले, तू बाहेर ये तुझ्याकडे बघताो’ असे म्हणून निघून गेला. त्यानंतर पुन्हा येऊन त्याने लाकडी बांबूने तक्रारदार यांना उजव्या हातावर मारुन त्यांचा महागडा आयफोन फोडून नुकसान केले आहे. या प्रकरणी पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत