शुक्रवारी दुपारी गोळ्यांच्या आवाजाने पुणे हादरलं. भरदिवसा कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ यांची त्याच्याच जवळच्या लोकांनी हत्या केली. पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली. मोहोळ याच्या हत्येनंतर पुणे पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करत हत्येच्या 12 तासांच्या आत याप्रकरणातील मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली.
यातच शरद मोहोळ याच्या हत्येचा कट कसा रचण्यात आला? ही संपूर्ण घटना कशी घडली आणि या प्रकरणातील मुख्य आरोपीची काय आहे क्राईम हिस्ट्री? ही संपूर्ण माहिती पुणे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितली आहे.
पुणे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, शरद मोहोळ घरातून बाहेर पडल्यावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोबत असलेल्या साथीदाराने त्याचा खून केला. आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर राहणार सुतारदरा आणि इतर 2 साथीदारांनी गोळ्या घालत मोहोळचा खून केला. घटनेनंतर 3 आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. मुख्य आरोपी पोळेकर हा शरद मोहोळ सोबत अनेक दिवसांपासून सोबत फिरत होता.
त्यांनी सांगितलं की, गुन्हे शाखेकडून तपासासाठी 8 पथक तयार करण्यात आली होती. शहरातील सर्व रस्ते बंद करत नाकाबंदी करण्यात आली होती. आरोपी खेडे शिवापूर टोलनाक्याजवळ लपून बसले होते. 3 आरोपींनी शरद मोहोळवर गोळ्या झाडल्या.त्यांनी पुढे सांगितलं, नामदेव महिपती कानगुडे आणि विठ्ठल किसन गांदले या दोघांचं शरद मोहोळ याच्यासोबत पूर्व वैमान्यातून ही हत्या केली. नामदेव कानगुडे हा मुख्य आरोपी पोळेकर याचा मामा आहे. यामुळेच हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आरोपींकडून मिळाली आहे. एकूण 8 आरोपी त्यातील दोन वकील आहेत.
ते म्हणाले, या वकिलांचा गुन्ह्यांमध्ये नेमका रोल काय याचा तपास आम्ही सुरू करत आहोत. गेल्या 25 दिवसांपासून मुख्य आरोपी शरद मोहोळच्या संपर्कात होते. मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याने पिस्टल गोळा केले होते. चार महिन्यांपूर्वी हे पिस्टल घेऊन आले होते आणि याच पिस्तलने शरद मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्या.