नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि राष्ट्रपती होतील, त्यांना हिंदू राष्ट्रामध्ये काहीही इंटरेस्ट नाही, फक्त तशी इमेज हवी आहे असं वक्तव्य जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केलं. आधी मोदी हे गांधी कुटुंबावर टीका करायचे, पण निकाल लागल्यानंतर सगळं बदललं असंही केतकर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या संसदेतील निवडक भाषणांचे संकलन असलेले “संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा” या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार कुमार केतकर, मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असिम सरोदे यांच्या उपस्थित करण्यात आलं. यावेळी कुमार केतकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
कुमार केतकर म्हणाले की, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांना आता कशी वागणूक मिळतेय ते आपण पाहतोय. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि 2027 साली राष्ट्रपती होतील. मोदी 2032 पर्यंत त्या पदावर राहतील. त्यांना हिंदू राष्ट्रामध्ये जास्त इंटरेस्ट नाही पण त्यांना त्या प्रकारची इमेज हवी आहे.