अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे याचिका दाखल केल्या आहेत. शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करण्यासाठी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा खासदार शरद पवार आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं याचिकेतून वगळण्यात आली आहेत. त्याचवेळी वंदना चव्हाण, फौजिया खान आणि मोहम्मद फैजल यांच्यावर मात्र कारवाईची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. मग कोल्हे आणि पवार बापलेकीचं नाव याचिकेतून का वगळलं? एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का? असे प्रश्न उपस्थित होतायेत.
या घडामोडीनंतर खासदार अमोल कोल्हे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी विधान भवनात पोहोचले आहेत. अजित पवार यांच्या कार्यालयात उभय नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. या सगळ्यानंतर अमोल कोल्हे आपली भूमिका बदलून अजित पवार यांना पाठिंबा देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.