‘‘मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याला विरोध करायचा असे कुणाला सांगायचे कारण काय? माझ्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे,’’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आरोप शनिवारी फेटाळून लावले. ‘राष्ट्रवादी’च्या नावावर मते मागितल्यावर आता भाजपबरोबर जाण्याची अजित पवार यांची भूमिका विसंगत आहे, अशी टीका पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-खासदारांची शनिवारी पुण्यात बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवार यांनी अजित पवार यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले.
मी राजीनामा दिल्यानंतर त्याला विरोध करायचा असे कुणाला सांगायचे कारण काय? मी राजीनामा दिल्यानंतर तो मागे घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड किंवा आनंद परांजपे यांच्या परवानगीची गरज नाही. माझ्यात स्वत:चा निर्णय घेण्याची कुवत आहे. कोण काय बोलले, यापेक्षा सत्य काय आहे, ते महत्त्वाचे आहे’’, असे पवार म्हणाले.
माझ्या पक्षातून सोडून गेलेले लोक पुन्हा निवडून येत नाहीत. १९६९ मध्ये मी १५ दिवसांसाठी परदेशात होतो. परत आलो तेव्हा माझ्याकडे सहा आमदार शिल्लक होते. त्यानंतर जी निवडणूक झाली, त्यात सोडून गेलेले पुन्हा विधानसभेत दिसले नाहीत. मी आतापर्यंत काय घडले त्याचा इतिहास सांगतोय,’’ अशा शब्दांत पवारांनी सोडून गेलेल्यांना इशारा दिला.