पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये आता नव्या वादाचे फटाके फुटत आहेत. राज्याच्या सरकारमध्ये महायुतीत भाजप – शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्रित आहेत. मात्र नियोजन समितीत निधीवाटपावरून हे सगळे एकमेकांसमोर येऊन ठाकले आहेत. यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. जिल्हा नियोजन समितीचे इतिवृत्त नसतानाही 800 कोटींची कामे मंजूर झाली आहेत. ही कामे रद्द करा; अन्यथा न्यायालयात जाणार, असा इशारा भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवारांना दिला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, राज्यात तीन पक्षाचं सरकार आलं आहे. या तीन पक्षांतील नेत्यांनी विविध जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद वाटून घेतले आहे. निधीवाटपाबाबत काही सूत्रे ठरली आहेत. सोलापूरचे पालकमंत्री असताना राधाकृष्ण विखे – पाटील यांनी जे सूत्र ठरवलं आहे. ते सूत्र पुण्यामध्ये ठरवण्यात आले आहे. काही समज – गैरसमज झाले असतील तर मला नाही माहीत, असं म्हणत अजित पवार यांनी निधीवाटपाचा चेंडू आता भाजपच्या कोर्टात ढकलला आहे.