राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या दुधामध्ये तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी केला. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनातून आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या दुधातून कोट्यवधी रुपयांची दलाली मिळविणारे हे सरकार असल्याची घणाघाती टीका रोहित पवारांनी केली. ते पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दूध पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी जीआर काढला होता. त्यामध्ये प्रतिलिटर 45 ते 50 रुपये या दराने विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा केला जात होता. मात्र, गेल्या वर्षी राज्य सरकारने हा जीआर बदलला अजून शेतकऱ्यांकडून 30 रुपये दराने खरेदी केलेले दूध या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तब्बल 148 रुपये लिटर या दराने दिले जात आहे. आंबेगाव तालुक्यातील आणि कोल्हापूर येथील राजकीय व्यक्तींशी संबंधित व्यक्तींच्या संस्थेला दूध पुरवण्याची आणि जेवण पुरविण्याची कंत्राटे देण्यात आली आहेत,” असा आरोप रोहित पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केला.
विकासाच्या नावाखाली राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या संबंधित असलेल्या संस्थांना दूध तसेच शालेय विद्यार्थ्यांना जेवण तयार करून देण्याचे कंत्राट देण्यात आले. या बदल्यात या संस्थांच्या माध्यमातून संबंधित राजकीय मंडळींना वर्षाला तब्बल अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांची दलाली मिळत आहे,” असा दावा रोहित पवारांनी केला.