मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पक्षाच्या मोठ्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला मनसे नेते वसंत मोरे यांच्यासह हजारो मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांना अजित पवार नावाचा मनसे कार्यकर्ता भेटला. हा कार्यकर्ता मूळचा बारामतीतला आहे. अजित पवार नावाच्या मनसे कार्यकर्त्याला पाहून राज ठाकरे यांना आधी हसू आलं. तसेच त्यांनी या भेटीवर प्रतिक्रियादेखील दिली.
राज ठाकरे म्हणाले, आमचा वसंत मोरे खूप शिस्तीने काम करणारा सहकारी आहे. त्याने उत्तमरित्या मतदारसंघाची बांधणी केली आहे. बारामती मतदारसंघ वसंतकडे आहे. याच मतदारसंघात आम्हाला अजित पवार सापडावा? त्याला पाहून मला कळेना हल्ली हे कुठल्याही पक्षात जातात की काय? परंतु, हा आपल्याबरोबरचा सहकारी आहे. यावेळी राज ठाकरे अजित पवारला (मनसे कार्यकर्ता) म्हणाले, फक्त आयुष्यात मला कधीही काका म्हणू नकोस.