संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांना वगळता शरद पवार गटातील इतर सात खासदारांना अजित पवार गटात येण्याची ऑफर दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर सुप्रिया सुळेंनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना फोन करून संताप व्यक्त केल्याच्या बातम्याही समोर आल्या. या सगळ्या घडामोडीनंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संभाव्य फुटीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
ज्याला जायचं असेल त्यांनी जरूर तिकडे जावं, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 56 आमदारांवरून 10 वर आला. यापेक्षा आणखी काय वाईट होऊ शकतं, अशा शब्दांत जयंत पाटलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. पुण्यात शरद पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीत जयंत पाटलांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी कुणाचंही नाव न घेता समोरच्या रांगेत बसलेल्या महत्त्वाच्या नेत्यांवरही टीकास्त्र सोडलं.
जयंत पाटील म्हणाले की, बैठकीत पहिल्या रांगेत बसलेले अनेकजण ‘तिकडे’ (अजित पवार गटात) हार आणि पुष्पगुच्छ देऊन आले. कोणाला ‘तिकडे’ जायचे असेल तर त्यांनी जरूर जावे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप) ५६ वरून १० वर आला आहे. यापेक्षा आणखी काय वाईट होणार आहे, अशा शब्दांत जयंत पाटलांनी अजित पवार गटाच्या वाटेवर असणाऱ्या नेत्यांचे कान टोचले आहेत.