Pune News पुण्यातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. सतीश वाघ यांच्या घरातील त्यांच्या चिरसंगिनी असलेल्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार झाल्याचे समोर येत आहे. पोलीस तपासात या बाबी समोर आल्या आहेत. या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे उद्योजक होते. ते 9 डिसेंबरला पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. या दरम्यान ब्ल्यू बेरी हॉटेल बाहेर चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवत त्यांचं अपहरण केलं होतं. ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. या दरम्यान त्याच दिवशी रात्री एका ठिकाणी घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. सतीश वाघ यांची अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकूने भोसकून, 72 वेळा वार करुन हत्या केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांचा युद्ध पातळीवर तपास सुरु होता.






