संभाजी भिडे गुरुजी यांनी आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून यु-टर्न घेतला आहे. मराठा म्हणजे वाघ आणि सिंह… आरक्षण कुठे घेऊन बसलात? असा सवाल संभाजी भिडे यांनी केला आहे. तर मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठून काढलं? असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार चांगलेच संतापले. यावेळी माध्यम प्रतिनिधींनाही त्यांनी फैलावर घेतलं. यावेळी, “संभाजी भिडे यांच्यावर वक्तव्य करण्याच्या लायकीची ती माणसं आहे का, असा सवाल शरद पवार यांनी केला. पुण्यातील मोदीबाग इथं शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला.
संभाजी भिडेंबाबत प्रश्न सुरू होताच तो पूर्ण व्हायच्या आत शरद पवारांनी त्यावर नाराजी व्यक्त करताना प्रतिक्रिया देणार नसल्याचं नमूद केलं. संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? म्हणूनच मी तुम्हाला भेटायचं नाही मी म्हणत होतो. हल्ली कसेही प्रश्न विचारतात. एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक.., असं म्हणत शरद पवारांनी त्यांची प्रतिक्रिया आवरती घेतली.