पुणे : निवडणूक आयोगाने आचारसंहितेची एकसमान अंमलबजावणी केली पाहिजे. ‘तुमचे मंगळसूत्र काढून घेतले जाईल,’ यासारखे तथ्यहीन प्रचार किंवा एखाद्या समुदायाला लक्ष्य करणाऱ्या विधानांवर आयोगाने कठोर कारवाई केली पाहिजे. मग ते पंतप्रधान असले, तरी निवडणुकीत उमेदवार आणि पक्षाचे प्रचारक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले गेले पाहिजे, असे परखड मत राज्याचे माजी निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘ज. स. करंदीकर स्मृती व्याख्याना’त ‘निवडणूक आयोग : आरोप-प्रत्यारोप’ या विषयावर देशपांडे बोलत होते. संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, गजेंद्र बडे यावेळी उपस्थित होते. देशपांडे म्हणाले, की पंतप्रधानांच्या राजस्थानमधील भाषणावरून निवडणूक आयोगाकडे सर्वाधिक आक्षेप नोंदविण्यात आले. वास्तविक, आचारसंहितेचा भंग झाल्यास आयोगाकडून संबंधित उमेदवाराला आणि प्रचारकाला नोटीस पाठविली जाते. यावेळी मात्र, आयोगाने संबंधित पक्षाच्या अध्यक्षांना नोटीस दिली. त्यामध्ये केवळ सल्ले देण्यात आले आहेत. इथे आयोगाच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला असून, आचारसंहितेची अंमलबजावणी सर्वांसाठी समान हवी.