अपघात प्रकरणात राजकीय दबावापासून पोलिसांच्या तपासासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अखेर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. या प्रकरणामुळे चर्चेत आलेले अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यासंदर्भात स्पष्ट भूमिका अमितेश कुमार यांनी मांडली. त्या दिवशी पोलीस ठाण्यात आमदार सुनील टिंगरे आले होते, हे सत्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार पोलीस ठाण्यात आले होते. ही बाब सत्य आहे. ते पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. पण अपघातानंतर पोलिसांकडून जी कारवाई झाली ती कायदेशीर आणि नियमानेच झाली आहे. ही कारवाई करताना पोलिसांवर कोणाचा दबाब नव्हता. तसेच पोलीस ठाण्यात आरोपींना पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातल्याच्या आरोपात तथ्य नाही, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
अपघाताप्रकरणात दोन एफआयआर का दाखल केले, त्यासंदर्भात अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिले. दोन एफआयआरमधील पहिला एफआयआर सकाळी ८ वाजता दाखल झाला. त्यात भादवि कलम ३०४ (अ) लावले होते. परंतु प्रकरणाचे गांभीर्य पाहून सकाळी ११ ते १२ दरम्यान दुसरा एफआयआर दाखल केला. त्यात भादंवि कलम ३०४ लावला गेला. एकाच दिवशी ते दाखल झाले. त्यामुळे हे दोन एफआर आहे, असे म्हणता येत नाही.