‘पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि दोषींवर कठारोत कठोर कारवाई केली जाईल. आरोपी मुलाच्या वडिलांसोबत ३ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर कठोर कारवाई हिच आमची भूमिका आहे.’, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. आज पुणे पोलिस आयुक्तांनी माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणाच्या संपूर्ण घटनाक्रमासह आतापर्यंत नेमकी काय काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती दिली.
अमितेश कुमार यांनी सांगितले की, ‘आरोपीविरोधातील दोन अर्ज कोर्टाने फेटाळले. अल्पवयीव आरोपीला सज्ञान समजावे यासाठी अर्ज केला होता. आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्याचा दुसरा अर्ज करण्यात आला होता. हे दोन्ही अर्ज कोर्टाने अमान्य केले. याप्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यात तीन जणांना एकाच रात्री अटक करण्यात आली आहे. याच गुन्ह्यात आरोपी मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पुण्यात आणण्यात येत आहे. तर दोन पब मालकांना अटक करण्यात आली आहे.’
‘ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण हे गंभीर आहे. आरोपी मद्य पित असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले आहे. अपघातावेळी आरोपी दारू प्यायला होता. आरोपीचे ब्लड रिपोर्ट अजून प्राप्त झालेले नाही. कोणताही रिपोर्ट निगेटिव्ह आलेला नाही. ब्लड रिपोर्ट लवकरात लवकर येईल.’, असे पुणे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. तसंच, ‘मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोन आले होते. त्यांनी तपासाबाबात सूचना केल्या आहेत. दोषींवर कडक कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.’
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुढे असे सांगितले की, ‘आरोपी आणि जे जे या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे हिच भूमिका आमची आणि शासनाची आहे. आरोपी सज्ञान असल्याची मागणी कोर्टात केली जाणार आहे. या प्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव नाही. अपघात प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही कडक कारवाई करत आहोत.’
तसंच, ‘पबचे मालक आणि व्यवस्थापक या अटक करण्यात आलेल्या तिघांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यातील चौथ्या आरोपीला जयेश बोनकर याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला ही उद्या कोर्टात हजर करणार आहोत.’, असे देखील पोलिस आयुक्तांनी सांगितले.
या प्रकरणातील दोन्ही मृतांच्या नातेवाईकांवर दबाव टाकला जात आहे तसंच धमकी दिल्या जात असल्याची माहिती समोर आली होती. यावर बोलताना पोलिस आयुक्तांनी सांगितले की, ‘मृतांचे नातेवाईक आणि मित्रांनी वाईट वागणूक देण्याचे, त्यांना धमकावण्याचा प्रकार आमच्या कानावर आला आहे. त्यावर आम्ही चौकशी करत आहोत. मात्र, नातोवाईकांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. नातेवाईकांना वाईट वागणूक आणि आरोपींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.’