पुण्यातील कार अपघातातील आरोपीला तो अल्पवयीन आहे म्हणून अवघ्या १५ तासांत विशेष हॉलिडे न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला होता. मात्र बाल हक्क न्यायालयाने याप्रकरणी कडक पावलं उचलली आहेत. बाल हक्क न्यायालयात आज (२२ मे) याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी आरोपीच्या वकिलांनी तो अल्पवयीन असल्याचा युक्तिवाद केला. तर आरोपीने केलेलं कृत्य भयावह असून त्याच्या चुकीमुळे दोन जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे त्याच्यावर खटला चालवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अल्पवयीन आरोपीची १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली आहे. तसे आरोपी सज्ञान आहे की अज्ञान हे पोलीस तपासानंतर ठरवलं जाईल, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, यावर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “या अपघाताप्रकरणी आम्ही न्यायालयाकडे दोन अर्ज केले होते. हे दोन्ही अर्ज रविवारी (१९ मे) झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने फेटाळून लावले होते. परंतु, आज आम्हाला दोन आघाड्यांवर यश मिळालं आहे. त्याला (१७ वर्षीय आरोपी) देण्यात आलेल्या जामीनात सुधारणा करण्यात आली असून त्याची १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्यावर अडल्ट (प्रौढ) म्हणून खटला चालवला जावा, असा अर्ज आम्ही केला होता. न्यायालयाने हा अर्ज विचाराधीन घेतला आहे. यावर येत्या २४ मे रोजी सुनावणी होईल. आम्ही या प्रकरणी सखोल तपास करून एक मजबूत खटला दाखल करू.”