पुणे ते अहिल्यानगर , शिर्डी ते पुणतांबा, शिर्डी ते नाशिक या 3 नवीन रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणास मान्यता…

1
53

मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी मानले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार

नगर – नगर जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित पुणे ते अहिल्यानगर, साईनगर शिर्डी ते पुणतांबा आणि साईनगर शिर्डी ते नाशिक या थेट रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणास रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मागणीवरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नगर जिल्ह्यातील जनतेला ही मोठी भेट दिली आहे. या मार्गासाठी समितीच्या बैठकीत वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या नवीन रेल्वे मार्गांमुळे नगरच्या औद्योगिक विकासाला गती मिळेल तसेच शेतकऱ्यांनाही शेतीमाल जलद गतीने बाहेर पाठवता येणार असल्याने ग्रामीण विकासालाही चालना मिळेल अशी माहिती मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी दिली.

नगर शहर-पुणे-नाशिक दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 248 किमी लांबीच्या दौंड-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणास मान्यता देण्यात आली आहे. एकूण 248 कि.मी.पैकी 178 कि.मी.चे काम पूर्ण झाले असून उर्वरित 70 कि.मी.चे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय तीन नवीन दुहेरी रेल्वे मार्गांना केंद्राने मंजुरी दिली आहे.

नाशिक – साईनगर शिर्डी (82 कि.मी.), पुणे – अहमदनगर (125 कि.मी.) दरम्यान नवीन दुहेरी ट्रॅक आणि साईनगर शिर्डी – पुणतांबा (17 कि.मी.) दरम्यान नवीन दुहेरी ट्रॅक अशा तीन रेल्वे प्रकल्पांसाठी सर्वेक्षणास मान्यता देण्यात आली आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर डीपीआर तयार केला जाईल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, पुणे आणि नाशिक यांच्या थेट जोडणीसाठी डीपीआर महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाने तयार केला आहे. हा महाराष्ट्र सरकार (50टक्के) आणि रेल्वे मंत्रालय (50 टक्के) यांचा संयुक्त उपक्रम आहे. डीपीआरमधील प्रस्तावित संरेखन नारायणगावमधून जाते जेथे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, पुणे यांनी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप वेधशाळा स्थापन केली आहे. जीएमआरटीमध्ये 31 देशांमधील (28 व्या चक्रापर्यंत) वापरकर्ते आहेत जे वैज्ञानिक निरीक्षणांसाठी त्यांच्या सेवा वापरतात. जीएमआरटी वेधशाळेच्या कामकाजावर प्रस्तावित रेल्वे मार्गाचा विपरीत परिणाम झाल्यामुळे हे संरेखन स्वीकार्य आढळले नाही. त्यामुळे आता हा प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेने डीपीआर तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
रेल्वे प्रकल्पांना मान्यता देणे ही भारतीय रेल्वेची निरंतर आणि गतिमान प्रक्रिया आहे. रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मोबदला, रहदारीचा अंदाज, शेवटच्या मैलाची जोडणी, गहाळ दुवे आणि पर्यायी मार्ग, गर्दीच्या/संतृप्त मार्गांचा विस्तार हे सामाजिक-आर्थिक विचारांच्या आधारावर सुरू केले जातात. या तिन्ही रेल्वे योजनांच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, मध्य रेल्वे समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
यामुळे नगर – पुणे, नगर -नाशिक नवीन रेल्वे मार्गाने जोडला जाईल. यामुळे नगरच्या विकासाला फार गती मिळेल असा विश्वास सुदर्शन डुंगरवाल यांनी व्यक्त केला आहे.

1 COMMENT

Comments are closed.