राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेनेकडून पुन्हा निवडून आलेले आमदार विजय शिवतारे यांच्यातील विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अजितदादांनी ‘तू कसा निवडून येतोस हेच पाहतो’ असं म्हणत शिवतारेंना उघड आव्हान दिलं होतं. यथावकाश शिवतारे बापू पडलेही. आताही महायुतीत एकत्र असताना शिवतारेंनी अजितदादांना टोला हाणला आहे. मुख्यमंत्रिपद नशिबात असायला हवं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांवरील प्रश्नावर शिवतारे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, जे निर्णय वरिष्ठ घेतील, त्यानुसार वागणे, अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला. राहता राहिला अजित पवारांचा विषय, तर प्रत्येक पक्षाच्या आमदार आणि नेत्यांना वाटत असतं, की आपला नेता सर्वोच्च पदावर जावा, पण ते (कपाळाकडे बोट दाखवत) इथे असायला हवं, असं म्हणत मुख्यमंत्रिपद नशिबी असायला हवं, असं शिवतारेंनी अप्रत्यक्षपणे सुचवलं. टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
मुख्यमंत्रिपद नशिबात असायला हवं…. शिंदे सेनेच्या आमदाराने अजितदादांना खिजवलं…
- Advertisement -