अंडा भुर्जीची एक भन्नाट रेसिपी सध्या व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळते. गंमत म्हणजे ही अंडा भुर्जी, शुद्ध शाकाहारी व्यक्तीदेखील खाऊ शकतो! अरेच्चा असं कसं काय? पडला ना प्रश्न… मग हे कसं शक्य आहे ते पाहा.
प्रसिद्ध यूट्यूब आणि इन्स्टाग्राम ब्लॉगर अमर सिरोही याने आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @Foodie_Incarnate या अकाउंटवरून या बिना अंड्याच्या अंडा भुर्जीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला “१०० टक्के शुद्ध शाकाहारी अंडा भुर्जी” असे कॅप्शन देण्यात आले असून, या भन्नाट रेसिपीने नेटकऱ्यांचेदेखील चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये ही भुर्जी नक्की कशी बनवली आहे ते पाहा.
या व्हिडीओमध्ये एका महिलेने सर्वप्रथम तव्यावर तेल तापवले. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि आले असे सर्व पदार्थ घालून परतवून घेतले. त्यानंतर यामध्ये व्हीगन [vegan- प्राण्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या कोणत्याही उत्पादनांचा ज्यामध्ये समावेश नसतो असे] स्क्रॅम्बल्ड अंडे घालून कांद्यासोबत छान शिजवून घेतले. सर्वात शेवटी थोडे मीठ, चिली फ्लेक्स घालून भुर्जी तयार केलेली आहे. अशी ही बिना अंड्याची अंडा भुर्जी ५० रुपयांना विकली जाते.