देवदैठणच्या भूईदरा देवस्थानचा निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून होणार विकास !
आमदार प्रा.राम शिंदे यांचा पाठपुरावा : वनविभागाकडून ५७ लाखांचा निधी मंजुर
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड : जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे वनविभागाच्या हद्दीत असलेल्या भ़ूईदरा देवस्थानचा निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकास होऊन याठिकाणी सुख सुविधा निर्माण व्हाव्यात याकरिता आमदार प्रा.राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सन २०२४ -२०२५ करिता निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास या राज्य योजनेतून वनविभागाने या देवस्थानसाठी ५७.३७ लाख रूपयांचा निधी मंजुर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
बालाघाट डोंगर रांगेच्या परिसरात जामखेड तालुक्यातील देवदैठण हे गाव येते. या भागात वनविभागाचे मोठे क्षेत्र आहे. याच क्षेत्रात हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले भूईदरा देवस्थान आहे. बालाघाट डोंगरात वसलेले हे पुरातन देवस्थान आहे. दरवर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे. या ठिकाणी महादेवाची पिंड व गुहा आहे. या देवस्थानचा विकास व्हावा अशी येथील ग्रामस्थ व भाविकांची मागणी होती. याच मागणीची दखल घेऊन आमदार प्रा.राम शिंदे यांनी सदर देवस्थानचा निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा याकरिता शासन दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत महायुती सरकारने सन २०२४ -२०२५ करिता निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास (२४०६ – २२९५) या राज्य योजनेतून जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील भूईदरा देवस्थानचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वनविभागाकडून सुमारे ५७.३७ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महसुल व वनविभागाकडून जारी करण्यात आला आहे. या निधीतून सदर देवस्थान परिसराचा निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकास होणार आहे.
भूईदरा देवस्थान परिसराचा विकास व्हावा यासाठी ह.भ.प. कैलास महाराज भोरे यांच्यासह या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक व भाविक प्रयत्नशील होते. त्यांची ही मागणी आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून मार्गी लागली आहे. भूईदरा देवस्थानचा निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकास होणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील भूईदरा देवस्थान परिसराचा विकास व्हावा अशी मागणी ह.भ.प. कैलास महाराज भोरे, स्थानिक पदाधिकारी, नागरिक व भाविकांकडून करण्यात आली होती. सदर देवस्थान परिसर वनविभागाच्या हद्दीत असल्याने या भागाचा निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा याकरिता माझा सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. महायुती सरकारने यासाठी ५७.३७ लाख रूपये निधी मंजुर केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व महायुती सरकारचे मनापासून आभार !
– आमदार प्रा राम शिंदे, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य