मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या लाभासाठी
31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
अहमदनगर :- राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यात एक हजार लाभार्थ्यांना यात्रेचा लाभ देण्यासाठी कोटा निश्चित करण्यात आला असुन इच्छुकांनी 31 ऑक्टोबर, 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा तसेच वय 60 किंवा त्यापेक्षा अधिक असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराचे आधारकार्ड, अर्जदाराचा मोबाईल क्रमांक, वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक असुन लाभार्थी किंवा कुटूंबातील सदस्य आयकरदाता नसावा. लाभार्थ्यांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समिमतीद्वारे करण्यात येईल.
जिल्ह्यासाठी एक हजार लाभार्थ्यांचा कोटा निश्चित केला असुन कोट्यापेक्षा अधिक अर्जांच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे ( लॉटसचे संगणकीकृत ड्रॉ) लाभार्थ्यांची निवड केली जाईल. कोट्यातील 100 टक्के अतिरिक्त लाभार्थ्यांची प्रतिक्षा यादीसुद्धा तयार केली जाईल. निवड झालेल्या लाभार्थी तीर्थयात्रेसाठी न गेल्यास प्रतिक्षा यादीत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्याला तीर्थयात्रेसाठी पाठविण्यात येईल. निवड झालेले लाभार्थी व प्रतिक्षा यादीवरील लाभाार्थ्यांची यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाजकल्याण विभागाच्या सुचना फलकावर तसेच योग्य वाटेल अशा माध्यमांद्वारे प्रसिद्ध केल्या जाईल.
निवड झालेली व्यक्तीच तीर्थयात्रेसाठी जाऊ शकेल. त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही. जर पती-पत्नीने स्वतंत्र अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेत तर आयुक्त, समाजकल्याण, पुणे याबाबत त्याला किंवा तीला तीर्थयात्रेला पाठविण्याचा निर्णय घेऊ शकतील. जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यानी या योजनेचा लाभ घ्यावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.