राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत आलेले अनुभव सांगितले. त्यावरून त्यांनी उपरोधिक टोलेबाजी केली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार नीलेश लंके यांच्याकडून विखे यांचा पराभव झाला. डॉ. विखे पाटील मतदारसंघात फिरत नाहीत, लोकांना भेटत नाही, असा आरोप प्रचारात त्यांच्यावर करण्यात आला होता. तर दुसरीकडे लंके यांची सामान्य माणूस, लोकांमध्ये मिसळणारा माणूस अशी प्रतिमा रंगविण्यात आली होती. अशाच मुद्द्यांवर निवडणूक प्रचार गाजला. डॉ. विखे पाटील यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती प्रचारात देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही.
विखे पाटील म्हणाले, आता मी ठरविले आहे की २४ तास उपलब्ध राहायचे. आता मला कोणी विकास कामे वगैरे काही सांगू नका. कोणाचा वाढदिवस असला की हजर, कोणाचा दहावा असला तर लगेच सांगा, कावळ्याच्या आधी तेथे सुजय विखे हजर होईल. हे मी अनुभवले आहे. शेवटी अनुभवातून माणूस शिकतो. तुम्ही फोन लावा, गडी हजर राहणार, असे सुजय म्हणाले. लोकसभा निवडणुकीत माझ्याविरोधात जे मित्र उभे होते, ते जागरण गोंधळला पहाटे चार वाजता लंगर तोडायला हजर राहतात. त्यामुळे आता मी ठरविले आहे. आता हेच करायचे. जागरण गोंधळ असला की कार्यकर्त्यांनी मला फोन करायचा, नाही तर मी कारवाई करीन. माझ्यावर विश्वास ठेवा, लंगर तोडालयाला मी येणार, असेही विखे पाटील म्हणाले.
मला विकासकामे सांगू नका..आता 24 तास जनतेत…दहावा असेल तर कावळ्याच्या आधी हजर राहिल…डॉ.सुजय विखेंच्या भाषणाची चर्चा
- Advertisement -