नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या तीन दिवसात झालेल्या सुमारे ३७ रुग्णांच्या मृत्यूवरून प्रशासन आणि राज्य सरकारला धारेवर धरलं जात आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जात आहे. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकेच नाही तर राहुल गांधी यांनी एक हृदयद्रावक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.राहुल गांधींनी ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. पंतप्रधान मोदीजी काळीजाला भेगा पाडणारा नांदेड येथील या गरीब आईचा हंबरडा ऐका. तुम्हच्या गुन्ह्यांची शिक्षा नेहमी गरीबांना का देता? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णलयात अंजली वाघमारे (२२) या महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. महिलेची नैसर्गिक प्रसुती होऊन तिने मुलीला जन्म दिला, मात्र दोन दिवसांनंतर अचानक बाळ आणि आई दोघांची तब्यत बिघडली आणि दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. यानंतर पीडितांच्या कुटुंबियांचा काळजाला घरे करणारा आक्रोश पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी शेअर केला आहे.