लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान स्थानिकांशी ते संवाद साधत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून तिथे प्रचारासंदर्भात राहुल गांधी व काँग्रेसचे अनेक नेते कार्यक्रम घेत आहेत. राहुल गांधींनी स्थानिकांशी साधलेल्या अशाच एका संवादात काश्मीरमधील महिलांनी त्यांना त्यांच्या लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी राहुल गांधींनी दिलेल्या मिश्किल उत्तरानंतर उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.
राहुल गांधींनी श्रीनगरमध्ये काही काश्मिरी युवतींशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये शिक्षण, रोजगार, राजकारण व विवाह अशा विविध मुद्द्यांचा समावेश होता. सोमवारी राहुल गांधींनी या चर्चेचा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला. यातला एक शॉर्ट त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यात या विद्यार्थिनी त्यांना लग्नाबाबतचं मत विचारत असताना दिसत आहेत. काश्मीरमध्ये विवाहाचं महिलांवर किती दडपण असतं? अशी विचारणा राहुल गांधींनी केली असता त्यावरून त्यांचा पुढील संवाद झाला. ‘लग्नाच्या दडपणाचं काय? ऐका काश्मीरमधल्या या तरुणांचं काय म्हणणं आहे’, अशी कॅप्शन राहुल गांधींनी या व्हिडीओबरोबर दिली आहे.