विधानसभा निवडणुकांना निकाल लागल्यानतंर अजित पवारांनी पडद्यामागून खेळी करण्यास सुरुवात केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा प्लॅन बी यशस्वी होण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवारांनी निकालाच्या दिवसांपासून शरद पवार गटातील पराभूत आणि निवडून आलेल्या उमेदवारांना फोन करण्यास सुरुवात केली होती. अजित पवारांनी फोन केलेल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी अजित पवारांशी भेटून चर्चा केली. राहुल जगताप आणि मानसिंग नाईक अशी या दोघांची नावे आहेत. राहुल जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी एकनिष्ठ राहिल होते. मात्र विधानसभेला त्यांचा पराभव झाला. तर मानसिंग नाईक हे शिराळा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.
राहुल जगताप हे आज सकाळीच अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत बंद दाराआड चर्चा केली. यानंतर आता राहुल जगताप हे लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राहुल जगताप हे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत राहुल जगताप हे पक्षात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे.