विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज अंतिम निकाल जाहीर केला. हा निकाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. त्यांनी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती वैध ठरवली. तसेच शिंदेंच्याच पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. पण तरीही त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही. याबाबत विधानसभा अध्यक्षांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. ठाकरे गटाचे आमदार अपात्र न होण्यामागे भरत गोगावले यांची चूक कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप योग्य पद्धतीने ठाकरे गटापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र करता येणार नाही, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं.
“कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवण्यासाठी काही नियम आहेत. सर्वप्रथम मूळ राजकीय पक्षाच्या गटाचा व्हीपलाच मान्यता द्यावी लागते. त्या व्हीपला मान्यता देण्यात आल्यानंतर तो योग्य पद्धतीने दिला गेला आहे का? ते बघावं लागतं. त्यामुळे जरी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हीप आपण ग्राह्य धरला असेल तरी तो योग्यरित्या बजावला गेला आहे की हे बघणं आपलं कर्तव्य होतं. माझ्या संशोधनात निदर्शनास आलं की, भरत गोगावले यांच्याकडून जो व्हीप दिला गेला होता तो योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांना बजावला गेला नव्हता म्हणूनच त्यांना आमदार अपात्र करु शकत नाही”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्षांनी दिली.
…म्हणून ठाकरे गटाचे आमदार पात्र’, विधानसभा अध्यक्षांचं निकालानंतर मोठं वक्तव्य
- Advertisement -