भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरला आहे. राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांची निवड बिनविरोध होणार हे निश्चित आहे कारण दुसऱ्या कुणीही या पदासाठी अर्ज भरलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा अध्यक्षपादासाठी राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला. आज दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तोपर्यंत राहुल नार्वेकर वगळता कुठलाही अर्ज आलेला नाही त्यामुळे त्यांची निवड ही निश्चित मानली जाते आहे.
“महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे मी आभार मानतो कारण या सगळ्यांनीच माझ्यावर विश्वास दाखवत मला महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष बनण्याची संधी दिलेली आहे. मी सगळ्या विधीमंडळ सहकाऱ्यांचेही मी आभार मानतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की भाजपा ही पार्टी विथ डिफरन्स म्हणून मानली जाते. ज्यावेळी कुठल्याही पदाची जबाबदारी दिली जाते तेव्हा त्याचं वय किंवा त्याचा अनुभवच ग्राह्य धरला जात नाही तर त्याचं मेरिट पाहिलं जातं. युथला प्रमोट करण्याचं काम भाजपाने सातत्याने केलं आहे. त्यामुळे ही निवड दिसून येते आहे.” असं राहुल नार्वेकर म्हणाले. तसंच त्यांनी विरोधकांवरही टीका केली.