विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि कोपरगाव मतदार संघातील उमेदवार संदीप वर्पे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे अनामत रक्कम भरून अर्ज केले आहेत. तनपुरे यांनी पाच मतदान केंद्रावरील ईव्हीएम तर वर्पे यांनी एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केले आहेत.
लोकसभा- विधानसभा निवडणुकीतील क्रमांक दोन व तीन या पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसाच्या आत पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणी बाबत मागणी करता येते. एका मतदान केंद्रासाठी 47 हजार दोनशे रूपये शुल्क आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर) जाहीर झाला. राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंबर दोनचे मते मिळविले उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी मतदार संघातील पाच मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी त्यांनी एक मतदान केंद्रासाठी 47 हजार दोनशे रूपये असे, पाच केंद्राचे एकूण 2 लाख 36 हजार रूपये शुल्क भरले आहे.
तसेच कोपरगाव मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंबर दोनचे मते मिळालेले उमेदवार संदीप वर्पे यांनी देखील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणी बाबत अर्ज दाखल केला आहे. यासाठी त्यांनी 47 हजार दोनशे रूपये शुल्क प्रशासनाकडे भरले आहे. दरम्यान निकाल लागल्यानंतर 45 दिवसानंतर पडताळणी केली जाणार आहे.