नगर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच मतदारसंघात इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहुरी – नगर – पाथर्डी हा मतदारसंघ आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पाच टर्म आमदारकी भूषवली आहे. २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर राहुरी मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर दोन वेळा त्यांनी या मतदारसंघात मोठे विजय मिळवले. नगर तालुक्यात असलेलं एकहाती वर्चस्व आणि राहुरी, पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संच यामुळे कर्डिलेंनी या मतदारसंघात दोन वेळा विजय मिळवला. भाजपकडून निवडणूक लढवतानाच त्यांना वैयक्तिक करिष्माही कामी आला. सन २०१९ च्या निवडणुकीत मात्र या मतदारसंघात कर्डिलेंना अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. यात कर्डिलेंबाबत पसरवण्यात आलेल्या फेक नरेटिव्हचाही वाटा राहिला. कर्डिले यांनी पराभवानंतर लगेचच पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. दांडगा जनसंपर्क हा कर्डिलेंचा प्लस पॉइंट आहे. सकाळी ७ वाजताच त्यांच्या बुर्हाणनगर येथील जनता दरबार सुरू होतो. आमदार नसले तरी मतदारसंघातील नागरिक आपली कामे घेऊन सकाळीच कर्डिलेंचा बंगला गाठतात. आलेला व्यक्ती कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता कर्डिले संबंधितांचे योग्य काम मार्गी लावतात. त्यांच्यासाठी मतदारसंघातील जनता फक्त मतदार नाही तर कुटुंबातील सदस्य असतात. कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्यांचे काम केलेच पाहिजे असे ते मानतात.
कर्डिले यांचा दिवस सकाळी सातला सुरू होतो. सकाळी जनता दरबार झाल्यानंतर गावागांना भेटी, दशक्रिया विधी, लग्न कार्यांना उपस्थिती लावून ते सतत लोकांमध्ये असतात. जिल्हा बँकेत संचालक आणि आता चेअरमन म्हणून ते शेतकरी सभासद केंद्र स्थानी ठेऊन अनेक निर्णय राबवत आहेत. जिल्हा बँके शेतकरी संभासदांची कामधेनू कशी राहील यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच कर्डिले साहेब जिल्हा बँकेचे चेअरमन झाल्यावर सामान्य शेतकरी आनंदीत झाला.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले असल्याने त्यांना ग्रामीण भागातील जनतेच्या अडीअडचणींची जाणीव आहे. आमदार असताना त्यांनी राज्य सरकारकडून मोठा निधी आणून गावागावात विकासगंगा पोहचवली. मागील पाच वर्षे आमदार नसतानाही त्यांनी महायुती सरकारकडून मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी आणला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा घनिष्ठ स्नेह आहे. भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे जेव्हा कधी राहुरी मतदारसंघाची चर्चा होते तेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर कर्डिले यांचेच नाव डोळ्यासमोर येते. कर्डिले आणि मतदारसंघातील जनतेचे असलेले आपुलकीचे नाते नगर जिल्ह्यातील अनेक प्रस्थापितांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरले आहे. साखर कारखानदार, शिक्षण सम्राटांच्या नगर जिल्ह्यात कर्डिले यांचे राजकारण अनेकदा वेगळं ठरलं आहे. स्वतः पैलवान असलेले कर्डिले कोणता डाव कधी खेळायचा आणि समोरच्याला आस्मान दाखवायचे यात माहिर आहेत. त्यामुळे त्यांच्याशी दोन हात करताना अनेक दिग्गज जरा सबुरीनेच घेतात. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर कर्डिले यांचेच वर्चस्व आहे. बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे कार्य केले आहे. नगर तालुका तीन विधानसभा मतदारसंघात विभागला आहे. परंतु या तीनही मतदारसंघात विधानसभेला कर्डिलेंची भूमिका महत्त्वाची ठरते.
२०१९ चा पराभव बाजूला सारत कर्डिले आता आमदारकीचा षटकार ठोकण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते श्रीगोंदा मतदारसंघातून मैदानात उतरतील अशीही चर्चा रंगली होती. मात्र कर्डिले स्वतः राहुरीतूनच लढणार असून मध्यंतरी या मतदारसंघात लढण्याची इच्छा दर्शविणारे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही स्पष्टीकरण देत कर्डीलेच राहुरीतून भाजपचे उमेदवार असतील हे जाहीर केले आहे. मागील पाच वर्षे राहुरीच्या विद्यमान आमदारांना मंत्री पदाची संधी मिळाली. परंतु त्यांना तितके प्रभावी काम करता आले नाही. जनतेचा भ्रमनिरास झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे मतदार पुन्हा एकदा कर्डिले यांनाच साथ देण्याच्या निर्णयाप्रत पोहोचले आहेत. कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांनी मागील काही काळात युवकांचे मोठे संघटन उभे केले आहे. त्यामुळे मतदारसंघात चित्र बदलले आहे. राहुरी मतदारसंघात बदलाचे वारे वाहू लागले असून यावेळी कर्डिले मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाले आहेत.
लेख लिहिणाऱ्या तुला काय घंटा माहिती आहे कारे राहुरीची????
म्हणे मंत्री यांना अपेक्षित कामे करता आली नाही……
येऊन बघ एकदा मतदार संघात