नाशिक शहरातील सराफ व्यवसायिकांकडे गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानावर तसेच त्यांच्या निवासस्थानावर आणि इतर ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 30 तासांपासून तपासणी सुरू आहे. एकाच ज्वेलर्सच्या दोन दालनांमध्ये तपासणी सुरु होती. नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकातील 50 अधिकाऱ्यांची एकाच वेळी कारवाई केली. या छापेमारीत बंगल्यातील फर्निचर फोडून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटा काढल्या.
नाशिक शहरात सराफ व्यवसायिक आणि बांधकाम व्यवसायिकांवर गुरुवारपासून आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. अचानक झालेल्या छापेमारीत कर बुडव्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले. मागील काही दिवसांपासून कर बुडवे व्यवसायिक हे आयकर विभागाच्या रडारवर होते. त्यानुसार आयकर विभागाचे अधिकारी खासगी वाहनातून नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली. ज्या ठिकाणी छापेमारी सुरू होती, त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.नाशिकमध्ये बड्या सराफी व्यवसायिकावर आयकर विभागाने छापेमारीची बातमी शहरात सर्वत्र पसरली. त्यानंतर त्याची चर्चा सुरु झाली. आयकर विभागाच्या छाप्यात 26 कोटींची रोकड तर 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची दस्तऐवज जप्त करण्यात आले