राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे आजपासून (शनिवार) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची कामे तातडीने आटोपून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
गुरुवारी (ता. ६ जून) महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात मान्सून दाखल झाला. त्यामुळे या भागात पावसाने तुफान बॅटिंग केली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आता पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३ दिवसांत मान्सून मुंबईसह विदर्भ तसेच मराठवाड्यात धडक देईल. त्यामुळे शनिवारपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजनुसार, आज मुंबई, पुणे, ठाणे, पालघर तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा सरी कोसळतील. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावासह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव तसेच इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील. विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.