राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे खरीप हंगामाला वेग आला असून शेतकरी सुखावला आहे. पुढील ४८ तासांतही राज्यात मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आलंय.
दरम्यान, जुलै महिन्यात राज्यासह संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील एल-निनो तटस्थ अवस्थेत गेला आहे. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत ला-निनाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे.